जलयुक्त शिवार अभियान

1. जलयुक्त शिवार अभियान (टप्पा-1)

शासन निर्णय दिनांक ५ डिसेंबर, २०१४ अन्वये सन २०१५ ते २०१९ या कालावधीत जलयुक्त शिवार अभियान राबविण्यात आले. दरवर्षी ५००० गावे या प्रमाणे ५ वर्षात २५००० गावे टंचाईमुक्त / जलपरिपूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. सदर कार्यक्रमांतर्गतची कामे केंद्र / राज्य सरकार / DPDC च्या माध्यमातून उपलब्ध होणाऱ्या निधीतून करण्यात आली. तसेच लोकसहभाग, विविध कंपन्यांकडून CSR, अनेक मंदिर न्यासाकडूनही निधी प्राप्त झाला. या बरोबरच निधीची कमतरता भासू नये म्हणून राज्य शासनाने सदर कार्यक्रमासाठी दरवर्षी विशेष निधी उपलब्ध करून दिलेला होता. निवडण्यात आलेल्या गावांचे MRSAC या संस्थेकडील (Remote Sensing & GIS) या आधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारे क्षमता उपचार नकाशे (Potential Treatment Map) तयार करून देशात प्रथमच वापरण्यात आले. सदरील नकाशे तयार करण्यासाठी महाराष्ट्र सुदूर संवेदन उपयोजन केंद्र, (MRSAC) नागपूर, तसेच भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणा (GSDA), पुणे या कार्यालयांनी विकसित केलेल्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आलेला आहे. गावातील पिण्याच्या पाण्याची गरज, शेतीसाठी लागणारे पाणी व जनावरांसाठी लागणारे पाणी विचारात घेऊन, पाणलोटामध्ये उपलब्ध पाणी, वाहून जाणाऱ्या पाण्यामधून किती पाणी अडविले आहे, किती पाणी अडवू शकतो या बाबी विचारात घेऊन पाण्याचा ताळेबंद करण्यात आला. सन २०१५ ते २०१९ या कालावधीत २२,५९३ गावांमध्ये जलयुक्त शिवार अभियानांतर्गत ६,३२,८९६ कामे पूर्ण करण्यात आली. जलयुक्त शिवार अभियानामुळे २०,५४४ गावे १०० टक्के जलपरिपूर्ण झाली असून २७,०८,२९७ टी.सी.एम. इतका जलसाठा निर्माण झाला आहे. त्यामुळे ३९,०४,३९४ हेक्टर सिंचन क्षमता (एक सिंचन दिल्यास) निर्माण झाली आहे.

2. जलयुक्त शिवार अभियान २.०

शासन निर्णय दिनांक ०३ जानेवारी, २०२३ अन्वये जलयुक्त शिवार अभियान २.० राबविण्याबाबतचा निर्णय घेण्यात आला आहे. सदर शासन निर्णय शासनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. जलयुक्त शिवार अभियान २.० अंतर्गत, जलयुक्त शिवार अभियान प्रथम टप्पा तसेच इतर पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रम न राबविलेल्या व गाव निवडीच्या निकषानुसार पात्र ठरणाऱ्या गावामध्ये मृद व जलसंधारणाची कामे करणे, जलयुक्त शिवार अभियान प्रथम टप्पा, तसेच इतर पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रम राबविलेल्या व गावांमध्ये पाण्याची गरज व अडविण्यास अपधाव शिल्लक असेल तेथे पाणलोट विकासाची कामे करणे, जलसाक्षरतेद्वारे गावातील पाण्याची उपलब्धता व कार्यक्षम वापर करणे, मृद व जलसंधारणाची कामे लोकसहभागातून हाती घेणे व उपलब्ध भूजलाच्या माध्यमातून पाणलोट क्षेत्राचा शाश्वत विकास करण्याच्या उद्देशाने जलयुक्त शिवार अभियान २.० राबविण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. जलयुक्त शिवार अभियान २.० मध्ये ५६७१ गावे निवडण्यात आलेली आहेत. निवडण्यात आलेल्या गांवामध्ये १,५४,५७१ कामे विविध यंत्रणांमार्फत प्रस्तावित आहेत.

शासन शुध्दिपत्रक ०३ जानेवारी, २०२३ प्रपत्र-अ
शासन शुध्दिपत्रक ०५ जानेवारी, २०२३